१५ जुलैला स्नेहसावलीला ५ वर्षे पूर्ण झाली. आम्ही सुरू केलेल्या छोट्याश्या प्रयत्नांना काहीतरी आकार येण्याची लक्षणे दिसत आहेत. खरं म्हणजे एखाद्या संस्थेसाठी ५ वर्षे म्हणजे खूपच कमी कालावधी आहे. पण तरीही ह्या ५ वर्षात आम्ही कितीतरी परावलंबी व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण करू शकलो ह्याचे समाधान आहे. पाचवा वर्धापनदिन कसा साजरा करावा हा विचार सुरू असताना आजही जी ज्येष्ठ मंडळी समाजकार्यात हिरीरीने झोकून देऊन समाज उन्नतीसाठी तळमळीने निःस्वार्थपणे काम करीत आहेत त्यांचा गौरव करावा, कौतुक करावे अशी कल्पना सूचली.
लगेच अशा ज्येष्ठांची यादी तयार केली. आज ज्येष्ठत्व स्वतःच्या शारीरिक, मानसिक आरोग्याच्या व कौटुंबिक समस्यांच्या प्रश्नांमध्ये व्यस्त असताना आमच्या गौरवमूर्ती मात्र वैयक्तिक समस्या बाजूला ठेवून भरीव कामगिरी करत आहेत त्यांचा स्नेहसावलीच्या व्यासपीठावरून सत्कार करण्यासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य समाजसेवक नगर येथील स्नेहालयचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी व प्रसिद्ध उद्योजक श्री विवेक देशपांडे ह्यांनी येण्याचे तात्काळ मान्य केले. असा हा गौरव ज्येष्ठत्वाचा हा सोहळा मागच्या शनिवारी आय एम ए हॉल मध्ये असंख्य हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला. ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे डॉ गिरीशजींचे व्याख्यान.... आपल्या सामाजिक जाणिवांचा, मनातील कळकळीचा, प्रामाणिक प्रयत्नांचा अविष्कार म्हणजे त्यांचे मार्गदर्शन होते. त्यांच्या भाषणाने सर्वजण भारावून गेले. श्री विवेकजी देशपांडे ह्यांचे अत्यंत मुद्देसूद विद्वत्ता प्रचूर भाषण खूप प्रभावी ठरले. काही सत्कारमूर्तींनी व्यक्त केलेल्या भावना सर्व उपस्थितांसाठी जीवनात सकारात्मकता कशी जपावी ह्यांची जणू मूर्तिमंत उदाहरणे स्पष्ट करीत * आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे,* *मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे"* ह्या ओळी सार्थ ठरवणारी होती. एकूणच खूप दर्जेदार कार्यक्रम आम्हाला ह्या निमित्ताने अनुभवता आला. ह्या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येकाचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. *डॉ बालाजी आसेगावकर व विश्वस्त मंडळी**स्नेहसावली केअर सेंटर छ. संभाजीनगर*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा