गुरुवार, २३ मे, २०२४

दातृत्वाचा परिमळ - डॉ बालाजी आसेगावकर

 आजची तरुण पिढी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सतत मोबाईलमध्ये गुरफटलेली, कानात गाणे ऐकण्यासाठी काहीतरी घालून कायम स्वमग्न अवस्थेत एका वेगळ्याच विश्वात रमलेली मुले मुली आपल्याला आजूबाजूला दिसत असतात . त्यांचे स्वतः पलीकडे लक्ष नसते. आपण त्यांच्याशी संवाद साधला तरी बऱ्याचवेळेस तो तुटक आणि त्रोटक असतो. ध्येयानी पछाडलेली, सकारात्मक तरुणाई अभावानेच पाहायला मिळते. मागच्या चार पाच वर्षांपासून स्नेहसवालीच्या निमित्ताने वेगवेगळे सकारात्मक अनुभव येत असतात. अगदी सामान्य लोकांच्या मनाचा मोठेपणा कर्णालादेखील लाजवेल अश्या दिव्यत्वाची प्रचितीही बऱ्याच येत असते.

हे सर्व सांगायचे कारण म्हणजे नुकतीच अशीच एक उमद्या मनाची तरुण मुलगी केतकी निरंतर ही स्नेहसावलीला भेट द्यायला आली. तिने संस्था पहिली आणि तिच्या वडिलांच्या स्मरणार्थ स्नेहसावली ह्या आमच्या सामाजिक संस्थेला अशी काही देणगी दिली की मी अगदी निशब्द झालो . आज तरुण मुले शिक्षणासाठी, नौकरीसाठी सत्ता धडपडत असतात. नौकरी मिळाली की प्रत्येकजण माझ्या पहिल्या पगारातून मी हे करीन, ते घेईन अशी स्वप्ने रंगवत असतो. काहीजण पहिला पगार देवाजवळ ठेवतात, आपले आई वडील भावंडे आप्तेष्ट आणि मित्रमंडळींसाठी भेटवस्तू घेतात. स्वतःची कित्येक वर्षांपासून अपूर्ण राहिलेली एखादी ईच्छा पहिल्या पगारातून पूर्ण करतात. तेव्हा प्रत्येकाच्या जीवनात पहिल्या पगाराला एक अनन्यसाधारण महत्व असते. पण ह्या पठ्ठीने मात्र पहिल्या पगाराची संपूर्ण रक्कम स्नेहसावलीला तर दिली आणि ती देतानासुद्धा इतक्या सहजपणे की आम्ही भारावूनच गेलो. तिच्याशी बोलल्यावर कळले की ती सॉफ्टवेअर अभियंता असून पुण्याला मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नुकतीच रुजू झाली होती आणि तिचा पहिला पगार जमा होताच तिने संपूर्ण पगाराचा धनादेश स्नेहसावलीतील गरजू आजी आजोबांच्या सुश्रुषेसाठी दिला. तिचा हा विचारच खूप अद्भूत होता. केतकीला हा दातृत्वाचा वारसा तिच्या वडिलांकडून आला असे सांगताना ती म्हणाली वडील त्यांच्या उत्पन्नच काही भाग कायम गरजूंना द्यायचे आणि तेही अश्या रीतीने की उजव्या हाताने दान देताना ते डाव्या हाताला पण समजले कळू द्यायचे नाही. नकळतपणे आई वडिलांचे हे संस्कार तिच्यावर बिंबवल्या गेल्यामुळे तिने वडिलांचाच कित्ता गिरवला. आई आणि वडिलांच्या वागण्याचे कसे नकळत संस्कार मुलांवर होत असतात ते ही लक्ष्यात आले. ह्या वयात समाजाप्रती असलेली तळमळ बघून मला म्हणावेसे वाटले "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेता जावे, घेणाऱ्याने घेता घेता, देणाऱ्याचे उमदे मनही घ्यावे....."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा