गुरुवार, २३ मे, २०२४

तो राजहंस एक.... डॉ बालाजी आसेगावकर

 एखादे झाड असे वहिवाट सोडून जन्म घेते, कुठे डोंगराच्या वर, तर कपारीला. ते जगाच्या रोजच्या रहाटगाडग्यापासून दूर असते. त्याच्याकडे कोणाचे लक्षही नसते व तेथेच कुठंतरी वळचणीला आपली वाढ खुंटवून जगत असते, झुरत असते. त्याच्या नशीबाने येणाऱ्या एखाद्या वाटसरूची त्यावर नजर पडते. तो वाटसरू त्या झाडाची शक्ती ओळखतो. तो त्याला जातायेता खतपाणी घालतो आणि काही दिवसातच ते झाड वाढायला, बहरायला लागते. असंच माणसाच्या बाबतीत पण घडते का??

केशवचा जन्म अशाच एका अभागी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच हा मंदबुद्धी असा ठप्पा पडला. वडिलांची नौकरी गेलेली, घरात खाणारी तोंडे फार व मिळकत कमी. मग तर केशवची फारच आबाळ सुरू झाली. त्याची स्वतःची जगण्याची इच्छाच मरून गेली. तो घरी फक्त खायचा आणि रात्रंदिवस नुसता बसून राहायचा. हळूहळू चालण्याची शक्ती पण गेली. सर्वकाही जागेवरच. केशवच्या भावाला साधीशी नौकरी लागली. थोड्याच दिवसात वडीलही आजारी पडले आणि मग भावाने केशवला स्नेहसावलीत ठेवले. मला भावाशी बोलताना त्याचे केशवबद्दल खूप तळमळ जाणवली. स्नेहसावली सामाजिक संस्था असल्याने अगदीच नाममात्र दरात आम्ही केशवला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. केशवला तपासल्यावर मला लक्षात आलें की त्याला असा कोणताच दुर्धर आजार नाहीये की ज्यामुळे तो चालू शकत नाही. तो अतिशय नैराश्यात होता आणि शरीरापेक्षा मानसिक आजाराचा भाग जास्त होता. मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना हा चालू शकतो, चला तर हे आवाहन आपण स्वीकारू असे सांगितले. मनोविकारतज्ञाची मदत घेऊन नैराश्यासाठी उपचार सुरू केले आणि काही दिवसात केशवमध्ये बराच फरक जाणवला. दिवसभर पडून राहणार केशव आता बसू लागला, शून्यात हरवलेल्या नजरेत आता उत्सुकता, चमक दिसू लागली. लवकरच तो बोलायला लागला पण मी चालूच शकत नाही ह्या ठाम विश्वासामुळे तो चालण्याचे प्रयत्नसुद्धा करायला तयार नव्हता. आमच्या फिजिओथेरपीच्या मॅडमने त्याला बसल्याबसल्या सायकल चालवायचा व्यायाम सुरू केला. रोजचे त्याचे समुपदेशन, व्यायाम, सर्व परिचारक व केअर टेकर यांचे प्रोत्साहन आणि काय आश्चर्य ! आल्यापासून दोन महिन्यातच वॉकरच्या मदतीने केशवने हळूहळू पावले टाकायला सुरू केले. त्याच्या पहिल्यावहिल्या पावलांचे मोठे कौतुक आम्ही स्नेहसावलीत केले. आज हाच तो केशव, स्वतः स्वागत कक्षाचे काम जिम्मेदारीने सांभाळतो. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नोंद ठेवत, त्यांच्याशी संवाद साधतो ह्यावर विश्वास बसत नाही. खरंच माणसाच्या मनाला अशी निगा करणारी, फुलवणारी लोकं किती गरजेची असतात अन एकदा ती मिळाली की गदिमांच्या "एका तळ्यात होती बदके पिले सुरेख" ह्या कवितेतील बदकाच्या पिल्लाप्रमाणे अवस्था होते. त्यांच्यातला त्या वेगळ्या पिल्लाला सर्वजण चिडवायचे की तू कुरूप आहेस, वेगळा आहेस. पण जेव्हा स्वतः त्या कुरूप पिल्लाला त्याच्यातील राजहंसाची जाणीव झाली तेव्हा त्याचे जीवनच बदलून गेले. तसेच काहीसे आमच्या केशवच्या बाबतीत घडले....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा